नागपूर सुधार प्रन्यास ट्रस्टीपदी कृष्णा खोपडे यांची नियुक्ती

मुंबई / नागपूर – नागपूर शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास (NIT) च्या विश्वस्त मंडळावर आमदार श्री. कृष्णाजी खोपडे यांची ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक २ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, १९३६ च्या कलम ४(१)(फ) आणि ४(७) नुसार, विधानसभा अध्यक्षांच्या शिफारशीनुसार श्री. खोपडे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांच्या अधिकारानुसार ही नामनिर्देशन पद्धतीने केलेली नियुक्ती असून, यामुळे श्री. खोपडे यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या विकास मंडळावर सदस्य म्हणून जबाबदारी मिळाली आहे.
या आदेशावर शासनाचे सह सचिव विद्या हम्पळे यांच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापूर्वीही श्री. खोपडे यांनी विविध सामाजिक व शासकीय क्षेत्रांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.
या नियुक्तीमुळे नागपूरच्या विकास कार्याला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समर्थक व नागरिकांतून आमदार खोपडे यांचे अभिनंदन केले जात आहे.