Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा ‘जल्लोष मोर्चा’, मनसेसोबत युतीचे संकेत? 5 जुलैला काय होणार, मोठी अपडेट समोर

Shiv Sena MNS Mumbai Morcha : विरोधी मोर्चा ऐवजी आता 5 जुलै रोजी एकत्रित जल्लोष मोर्चा काढण्यात यावा अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आणि त्याचवेळी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. मराठी भाषिकांच्या एकजुटीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. मात्र 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरेंचा एकत्रित मोर्चा मात्र रद्द करण्यात आला. असं असलं तरी 5 तारखेला एकत्रित जल्लोष साजरा केला जावा अशी इच्छा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी बोलणं सुरू असल्याचंही ते म्हणाले.
राज्य सरकारने हिंदीचा जीआर मागे घेतला आणि त्यानंतर ठाकरे बंधुंच्या मोर्चाचे काय होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. खासदार संजय राऊत यांनी हा मोर्चा काढण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्या निमित्ताने मराठी माणसाची एकजुट आणि शक्ती दाखवण्याची संधी दोन्ही ठाकरेंनी गमावली अशी चर्चा सुरू झाली.
उद्धव ठाकरेंनी मात्र त्या संदर्भात वक्तव्य केलं. आपण संकट आल्यानंतरच जागे होतो. पण आता कायम जागे राहून मराठी माणसाने अशीच एकजुट दाखवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. जरी हिंदी विरोधी मोर्चा होणार नसला तरी त्या ऐवजी विजयी मोर्चा, सभा किंवा कार्यक्रम घेण्याची इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यासंदर्भात राज ठाकरे यांच्या मनसेसोबत चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.
Uddhav – Raj Thackeray Meeting : राज ठाकरेंसोबत बोलणं झालं का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमचं बोलणं सुरू आहे. प्रत्यक्ष राजचं आणि माझं बोलणं सुरू नसलं तरी आमची माणसं बोलतात. म्हणूनच या लढ्यामध्ये जे जे कुणी सहभागी झाले, मराठी भाषा समिती, साहित्यिक, संस्था, मनसे, शिवसेना या सर्वांची 5 तारखेला एकत्रित सभा झालीच पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.”
Shiv Sena MNS Alliance : मनसेशी मोर्चापलिकडे युतीचे संकेत
मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसंच मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये अशा शब्दात त्यांनी मनसेशी मोर्चापलिकडे युती ठेवण्याचे संकेत दिलेत.
Mumbai MNS Shiv Sena Morcha : मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय
हिंदीसाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव होता याचं गूढ अजूनही कायम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. राज्य सरकारने हिंदीबाबतचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली. मराठी माणसाच्या एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करायला राज ठाकरे विसरले नाहीत.
दरम्यान, सरकारनं हिंदीचे जीआर रद्द केल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी शिवतीर्थकडे धाव घेत राज ठाकरेंचं अभिनंदन केलं. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी जल्लोष सुरू आहे. राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका सविस्तर मांडणार आहेत.